...Back

ई-श्रम कार्ड योजना 

ई-श्रम कार्ड योजना 

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारनं एक पोर्टल विकसित केलं आहे.

या पोर्टलवर नोंदणी केल्यास असंघटित क्षेत्रातील कामगाराला 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकणार आहे.

आतापर्यंत देशभरातल्या 25 कोटींहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केल्याचं भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं आहे.

 

पण, हे पोर्टल नेमकं काय आहे? या पोर्टलवर जाऊन ई-श्रम कार्ड कसं काढायचं? आणि याचे फायदे काय आहेत, याचीच माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

ई-श्रम कार्ड पोर्टल

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे.

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.

-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचं वय मात्र 16 ते 59 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे.

आयकर भरणारी तसंच EPFO (Employee provident fund organisation), ESIC (Employees state insurance corporation) चा सदस्य असलेली व्यक्ती मात्र यासाठी नोंदणी करू शकणार नाही.

एकदा का या पोर्टलवर नोंदणी केली, की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई-श्रम कार्ड दिलं जाईल. ज्याला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर असं म्हटलं गेलं आहे.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला e shram असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ई-श्रम पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Register on e-shram नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.

 

इथं Self Registration या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सांगायचं आहे. या दोन्ही पर्यायांपुढील NO या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट म्हणायचं आहे. पुढे आधार नंबर टाकायचा आहे. ओटीपी पर्यायावरील बरोबरची टिक तशीच ठेवायची आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.

त्यानंतर मग नोंदणीसाठीच्या अटी आणि शर्थी मला मान्य आहेत, यासमोरील डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग सबमिट म्हणायचं आहे.

पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून validate वर क्लिक करायचं आहे.

 

मग तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स नाव, जन्मतारीख पत्ता दिसेल. याखाली असलेल्या वरची सगळी माहिती बरोबर आहे, या डब्ब्यात तुम्हाला टिक करायचं आहे आणि मग continue to other details वर क्लिक करायचं आहे.

आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात लग्नाचं स्टेटस, वडिलांचं नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे. पुढे अपंग असाल तर yes नसाल तर no वर टिक करायचं आहे.

त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीचं नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं नातं निवडायचं आहे. मग save and continue वर क्लिक करायचं आहे.

पुढे पत्त्यासंदर्भात माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सध्याचा पत्ता सांगायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे.

 

त्यानंतर मग तुम्ही याठिकाणी किती वर्षापासून राहता ते सांगायचं आहे. हे झालं की मग परमानंट अड्रेस टाकायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

आता शैक्षणिक माहीत भरायची आहे. इथं सुरुवातीला तुमचं शिक्षण किती झालं ते निवडायचं आहे आणि मग दरमहा किती कमावता तोही आकडा निवडायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

 

पुढे ऑक्युपेशन आणि स्किल या पेजवर प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये तुम्ही सध्या काय व्यवसाय करता ते सांगायचं आहे आणि मग किती वर्षांचा अनुभव आहे तो आकडा निवडायचा आहे. अजून दुसरा व्यवसाय करत असाल तर ते सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स टाकायचे आहेत.

यात बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे. तो पुन्हा टाकून कन्मफ करायचा आहे. पुढे खातेदाराचं नाव, बँकेचा आयएफएससी कोड, बँकेचं नाव आणि शाखेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

पुढे आता तुम्ही नोंदणी करताना जी माहिती भरली ती एकाच ठिकाणी दाखवली जाईल. ती वाचून घ्यायची आहे आणि शेवटी मी भरलेली सगळी माहिती खरी आहे, अशा आशयच्या डिक्लेरेशनवर टिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमचं ई-श्रम कार्ड स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनवरील उजवीकडच्या Download UAN कार्डवर क्लिक केलं की तुमचं ई-श्रम कार्ड डाऊनलोड होईल.

या पेजवर सर्वांत खाली असलेल्या Complete registration वर क्लिक केलं की तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

ई-श्रम कार्डाचे फायदे काय?

ई-श्रम कार्ड हे आधारसोबत लिंक करण्यात आलं आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.

भविष्यात सर्व सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ याच पोर्टलद्वारे दिला जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

 

Contact Us